Health News : नगर थंडीची चाहूल लागली असतानाच सर्दी ताप खोकल्याच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दाखल रुग्णांमध्ये पेशी कमी होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे.
जर पेशी झपाट्याने कमी होत असतील, तर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, कारण तो डेंग्यू असू शकतो. आठवडाभरात ६४ डेंग्युचे रूग्ण आढळले. एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.’
हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा भरातील ग्रामीण व शहरी भागातील रूग्णालयात थंडी तापाचे रूग्ण दाखल आहे. त्यात पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले.
२८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण भागात २७ तर शहरीभागात ३९ रूग्णांना डेंग्युचे निदान झाले. दोन मृत्यूपैकी नेवासे तालुक्यातील सोनई येथील एका मुलीचा मृत्यू झाला.
कोणत्याही तापामध्ये पेशी कमी होतात, पण जर झपाट्याने पेशी कमी होत असतील तर डेंग्यु असल्याची शक्यता आहे, असे जिल्हा हिवताप कार्यालयाने सांगितले.
अंगावर आजार काढू नका
कोणत्याही व्यक्तीला ताप, अंगदुखी, सांधेदुखी असेल तर त्वरित उपचार घ्यावेत. अंगावर आजारपण काढू नये. ताप कोणताही असेल तरी पेशी कमी होऊ शकतात,
पण डेंग्युमध्ये दररोज २० ते ३० हजार पेशी कमी होऊ शकतात. रूग्ण बाधीत आले, तेथे सर्वेक्षण केले असून फॉगिंगच्या सूचना दिल्या आहेत. डॉ. तन्मय कंटे, जिल्हा हिवताप अधिकारी, अहमदनगर