डिप्रेशनच्या गोळ्या बऱ्याच दिवसांपासून घेत असाल तर येवू शकतो हर्टअटॅक, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर

डेन्मार्कमधील ४३ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात आढळले की, अँटीडिप्रेसंट औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास अचानक हृदयविकाराचा धोका वाढतो. ६ वर्षांहून अधिक औषध सेवन करणाऱ्यांत हा धोका २.२ पट अधिक असल्याचे निष्कर्षात स्पष्ट झाले.

Published on -

डिप्रेशनच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीडिप्रेसंट औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून झाला आहे. डेन्मार्कमध्ये ४३ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, जे लोक एक ते पाच वर्षे ही औषधे घेतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५६ टक्क्यांनी जास्त असते.

तर सहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ही औषधे घेणाऱ्यांमध्ये हा धोका तब्बल २.२ पट वाढतो. हा धोका व्यक्तीचे वय आणि औषधांचा वापर किती काळ केला यावर अवलंबून आहे.

३० ते ३९ वयोगटातील लोकांमध्ये अधिक धोका

विशेषतः ३० ते ३९ वयोगटातील लोकांमध्ये हा धोका अधिक गंभीर आहे. या वयोगटातील ज्या लोकांनी एक ते पाच वर्षे अँटीडिप्रेसंट औषधे घेतली, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही औषधे न घेणाऱ्यांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. त्याचप्रमाणे, ५० ते ५९ वयोगटातील लोकांमध्ये एक ते पाच वर्षे औषधे घेणाऱ्यांना हा धोका दुप्पट, तर सहा वर्षांहून अधिक काळ औषधे घेणाऱ्यांना चारपट जास्त आहे.

डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील रिग्शोस्पिटालेट हार्ट सेंटरच्या डॉ. जास्मिन मुजकानोविक यांनी सांगितले की, अँटीडिप्रेसंट औषधांचा वापर जितका जास्त काळ होतो, तितका हृदयविकाराचा धोका वाढतो.

नियमित तपासणी करणे गरजेचे

संशोधकांनी असेही नमूद केले की, ३९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयाचे स्नायू जाड होणे हे या समस्येचे प्रमुख कारण आहे. तर वृद्ध लोकांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद होणे हे मुख्य कारण आहे. त्यामुळे डिप्रेशनच्या उपचारासाठी दीर्घकाळ अँटीडिप्रेसंट औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी आपल्या हृदयाच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News