२० मार्च २०२५, अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान वाढत असून, मध्यरात्रीनंतर ते कमी होत आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले असले, तरी बालकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. सर्दी, खोकला, ताप आणि उलट्या (व्हायरल गॅस्टरायटिस) यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या गेल्या आठवड्यात २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.
अहिल्यानगर शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या तापमानातील बदलांमुळे बालरुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि उलट्यांनी त्रस्त असलेल्या बालकांची संख्या वाढली आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.

मध्यरात्री रुग्णालयात धाव
सर्दीमुळे नाक बंद झाल्याने अनेक बालकांना झोपेत श्वास घेताना घरघर ऐकू येते. यामुळे रडणाऱ्या मुलांना घेऊन पालकांना मध्यरात्री रुग्णालयात जावे लागत आहे. काही मुलांमध्ये डोळे येण्याची लक्षणेही आढळली आहेत. तापमानवाढीमुळे लोक थंड ताक, आईस्क्रीमसारखे पदार्थ खात आहेत, परंतु यात वापरला जाणारा बर्फ अनेकदा अस्वच्छ असतो. बालरोगतज्ज्ञांनी असे पदार्थ मुलांना देणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. बदलत्या हवामानात अशा गोष्टींवर कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच, आजाराची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांकडे जाणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाहेरील पदार्थांपासून सावध रहा
हवामान बदलाच्या काळात बाहेरचे थंड पदार्थ टाळावेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. घरात लहान मुले असल्यास मोठ्यांनी शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा वापर करावा आणि मास्क घालावा. आजारी मुलांना काही दिवस शाळेत पाठवू नये, जेणेकरून इतर मुलांना संसर्ग होणार नाही, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.