४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा सामना करावा लागतो.मात्र काही वेळा आपल्या दैनंदिन तसेच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते आणि आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसू लागतो. काही गोष्टी अशा आहेत की, वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतात.या सवयींच्या मदतीने आरोग्यही सुधारते आणि तुम्हाला अधिक तंदुरुस्त आणि सक्रिय वाटते.
शिस्तबद्ध जगा : तुमची दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. वेळेवर झोपणे, खाणे, व्यायाम करणे इत्यादींमुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहतेच; परंतु तुमच्या त्वचेसाठीही या गोष्टी फायदेशीर असतात. त्यांच्या मदतीने आपल्याला वृद्धत्वाची लक्षणे कमी करता येतात.
पुरेसे पाणी प्या : दररोज पुरेसे पाणी न प्यायल्याने त्वचा निस्तेज आणि कोरडी होते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा वाढतात.त्यामुळे दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे.पाण्यामुळे त्वचा रखरखीत राहत नाही आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते.
सनस्क्रीन वापरणे : सूर्याच्या हानीकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते आणि सुरकुत्या, रंगद्रव्य आणि काळे डाग पडतात.त्यामुळे हवामान कोणतेही असो, घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा, जेणेकरून अतिनील किरण तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकत नाहीत.
जंक फूड,प्रक्रिया केलेले अन्न टाळा : जंक फूड आणि अस्वास्थ्यकर आहाराचा शरीरावर आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. जंक आणि प्रक्रिया (प्रोसेस्ड) केलेल्या अन्नामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते. त्यामुळे या गोष्टी टाळा.
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा : शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने वाढू लागते.याव्यतिरिक्त चयापचयदेखील मंदावते आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात.त्यामुळे दररोज व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहा : धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या व्यसनांमुळे शरीरातील ‘कोलेजन’चे नुकसान होते.त्यामुळे त्वचा सैल आणि निर्जीव बनते. त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहून वृद्धत्वाचा वेग कमी करता येतो.
नियमित त्वचेची काळजी : त्वचेची योग्य काळजी न घेणे, जसे की मॉइश्चरायझर, क्लिन्जर किंवा फेस मास्क न वापरल्याने त्वचा लवकर वृद्ध दिसू शकते. म्हणून आपल्या त्वचेच्या गरजेनुसार दररोज त्वचेची काळजी घ्या.
पुरेशी झोप घ्या : पुरेशी झोप न मिळाल्याने काळी वर्तुळे आणि त्वचा थकलेली दिसते.चांगली झोप त्वचा दुरुस्त करते आणि तिला चकाकी येते. त्यामुळे दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
दररोज ध्यानधारणा करा : तणावामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. अशा परिस्थितीत, दररोज ध्यानधारणा केल्याने वृद्धत्वाची लक्षणे अकाली दिसून येत नाहीत.