Health News : निरोगी राहायचे असेल, तर काही गोष्टी पाळाव्याच लागतात. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, खाणे. आपण खाण्यात काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. परंतु सध्या पाकिटबंद पदार्थ खाण्याला लोक प्राधान्य देत आहेत.
हे पदार्थ असे तयार केलेले असतात की ते पदार्थ खाण्यासाठी हवेहवेसे वाटतात आणि पुढे जाऊन त्याचं व्यसन लागतं; परंतु काहीही झाले तरी, आरोग्यासाठी पौष्टीक आहार महत्वाचा असून पाकिटबंद पदार्थांपासून दूर राहाणे गरजेचे आहे.
सध्याचे युग हे धावपळीचे आहे. अनेक जणांना व्यवस्थित खाण्यालाही वेळ मिळत नाही. त्यामुळे हे लोक रेडी टू इट म्हणजेच पाकिटबंद पदार्थावर ताव मारतात. विशेष करून नाष्त्याला किंवा मध्ये अध्ये भूक लागल्यास अशा पाकिटबंद पदार्थांचा वापर केला जातो.
मग त्यात चॉकलेटपासून ते चिप्सपर्यंत सर्वच पदार्थ येतात. आजकाल जवळपास सर्वच पदार्थ पाकिटबंद मिळतात. त्यामुळे अशा पदार्थांचे आपल्या पोटात जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
प्लास्टिकच्या वेष्टनामध्ये किंवा कागदामध्ये पॅक केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. पाकिटबंद पदार्थ दीर्घकाळ टिकून राहावे यासाठी या पदार्थांवर प्रक्रिया केली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रिझर्वेटीव्ह वापरले जातात.
मीठ, सोडीयम अशा पदार्थांचाही मारा केला जातो. तसेच हे पदार्थ शिळे असल्यामुळे त्यात पोषणमूल्यांचेही प्रमाण कमी असते.
लोक पाकिटबंद पदार्थ मोठ्या आवडीने घेतात, त्या पाकिटावरील एक्स्पायरी डेटही आवर्जुन पाहातात; परंत पाकिटाच्या मागील बाजूला लिहिलेल्या सूचना मात्र वाचायच्या विसरतात. बऱ्याच कंपन्या आपापल्या पॅकिंगवर त्याततील पौष्टीक तत्वांची आणि वापरलेल्या पदार्थांची माहिती देतात.
ही माहिती आपल्याला तो पदार्थ खावा की नाही, हे ठरवायला मदत करते; परंतु ही माहिती खूप छोट्या अक्षरामध्ये लिहिलेली असते. ती वाचण्यासाठी कष्ट पडतात, आणि नेमके त्यामुळेच ही माहिती कुणी वाचत नाही.
अशा पदार्थांचे आहारात प्रमाण जास्त राहिल्यास वजन वाढणे, मधूमेह, हृदयविकार, कर्करोग यासह इतर अनेक आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळणे कधीही चांगलेच.