Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- येत्या चार ते पाच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आपण यश मिळवले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचा झेंडा फडकवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अहिल्यानगरातून त्यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
मंगळवारी (दि. ६) अहिल्यानगरात भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला. यानिमित्त सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, विक्रमसिंह पाचपुते, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

एकजुटीने काम करा
फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. भाजप हा दीड कोटी सदस्यसंख्या असलेला देशातील एकमेव पक्ष आहे. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करू. अहिल्यानगरातील हे नवे कार्यालय पक्षाच्या विस्ताराला बळ देईल आणि सर्वसामान्यांसाठी हक्काची जागा बनेल.
निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, २०२४ हे नेत्यांच्या निवडणुकीचे वर्ष होते, तर २०२५ हे कार्यकर्त्यांचे वर्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवत निवडणुका घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आजपासूनच निवडणुकीची तयारी सुरू करा. पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अहिल्यानगरातील भाजपचे कार्यालय ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल. यावेळी जिल्ह्यातील नवनिर्वाचित मंडलाध्यक्षांचा सत्कारही करण्यात आला.
अनेक भाजप नेत्यांची उपस्थिती
कार्यक्रमाला माजी आमदार बबनराव पाचपुते, वैभव पिचड, लक्ष्मण सावजी, विजय चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आभार सुजय विखे पाटील यांनी मानले.
आभार प्रदर्शनासाठी सुजय विखे पाटील मंचावर आले तेव्हा बावनकुळे म्हणाले, या कार्यालयाचे उद्घाटन भाजपच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत होईल, हे सर्वांना सांगा. यावर विखे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार उद्घाटनप्रसंगी हे दोन्ही पदाधिकारी भाजपचेच असतील.