Nirjala Ekadashi 2025: हिंदू धर्मात निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी ज्येष्ठ शुक्ल पक्षात येते आणि संपूर्ण वर्षातील सर्व एकादशी व्रतांचे पुण्य एकट्याच उपवासाने मिळते, असे मानले जाते. 2025 मध्ये निर्जला एकादशीचे पवित्र व्रत आज 6 जून रोजी, शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी अन्न आणि पाणी दोन्ही पूर्णपणे वर्ज्य केले जात असल्यामुळे हा उपवास सर्वांत कठीण मानला जातो. तरीसुद्धा, या उपवासाचे पुण्य इतके अधिक आहे की भक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने हे व्रत स्वीकारतात.
ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते. या दिवशी विष्णूची विधीवत पूजा करून, दिवसभर उपवास करत ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी रवियोगाचा संयोग असल्यामुळे या वर्षीचा दिवस आणखी फलदायी ठरतो. या दिवशी उपवास करणाऱ्यांना संयम, श्रद्धा आणि नियमाचे पालन करणे आवश्यक असते.

शुभ वेळ-
या वर्षी एकादशी तिथी 6 जून रोजी पहाटे 2:15 वाजता सुरू झाली असून ती 7 जून रोजी पहाटे 4:47 वाजता समाप्त होईल. तर पारणाचा मुहूर्त 7 जून रोजी दुपारी 1:44 ते 4:31 या वेळेत आहे.
पूजाविधी-
पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे घालावीत आणि पूजा स्थळी भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावावा. त्यानंतर तुळशीच्या पानांसह फुलं, कुंकू, तांदूळ इत्यादी अर्पण करावीत. मंत्रजप करून, भगवंताची प्रार्थना करावी. दिवसभर उपवास करताना फक्त भक्ती आणि ध्यानात मन रमवावे. संध्याकाळी विष्णू-लक्ष्मीची आरती करून दिवा लावावा.
महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पाणी सुद्धा पिऊ नये, कारण या व्रताचे नावच ‘निर्जला’ – म्हणजेच ‘पाण्याविना’. त्यामुळे पूजा करतानाही पाण्याचे सेवन टाळले जाते. उपवासाच्या शेवटी ब्राह्मणांना अन्नदान केल्यास किंवा गरजू लोकांना अन्न, पाणी आणि दान दिल्यास व्रत अधिक फलदायी ठरते.
ही एकादशी भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते, कारण महाभारतातील भीमाने केवळ ही एकदाच एकादशी पाळली होती. त्यामुळे या व्रताचे फल सर्व एकादशीच्या व्रतांइतके मानले जाते. जो कोणी या व्रताचे पालन श्रद्धेने आणि शुद्ध मनाने करतो, त्याला जीवनात आध्यात्मिक उन्नती, मनःशांती आणि भगवान विष्णूची कृपा लाभते.