संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ विधेयके

Sushant Kulkarni
Published:

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणासोबत शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल.अधिवेशनापूर्वी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली.तर चर्चेच्या मुद्द्यावर कामकाज सल्लागार समिती निर्णय घेईल,असे सांगत सत्ताधाऱ्यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचे विरोधकांना आवाहन केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सरकारक डून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल.अधिवेशनाच्या अनुषंगाने गुरुवारी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.संसद भवन परिसरात ही बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी बैठक सकारात्मक राहिल्याचे सांगितले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत २६ राजकीय पक्षांचे ५२ नेते सहभागी झाले होते. काही नेत्यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. मात्र अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची, हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरेल, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी विरोधकांची इंडिया आघाडी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुर्दशा यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.

दोन भागांत अधिवेशन : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांत होणार आहे. दोन्ही भागांसह ४० दिवसांत एकूण २७ बैठका होणार आहेत.
पहिला भाग: शुक्रवार, ३१ जानेवारी ते गुरुवार, १३ फेब्रुवारी या १४ दिवसांत ९ बैठका होणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.

शनिवार, १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १२-१३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देतील आणि सीतारामन अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील.

दुसऱ्या अधिवेशन काळात सोमवार, १० मार्च ते शुक्रवार ४ एप्रिल या २६ दिवसांत १८ बैठका होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ४ एप्रिलपर्यंत दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान पार पडेल, तर १० मार्चपासून दुसरा टप्पा सुरू होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe