Worlds Billionaire List | फोर्ब्सने 2024 साली प्रकाशित केलेली अब्जाधीशांची यादी समोर आली आहे. यावर्षी या यादीत 3,028 लोकांचा समावेश झाला असून यामध्ये तब्बल 247 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या यादीतील निम्म्याहून अधिक श्रीमंत लोक फक्त तीन देशांमध्येच राहतात. आणि भारत या देशांच्या यादीत मानाचं स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, अमेरिका ही अजूनही जगातील सर्वाधिक श्रीमंतांची राजधानी आहे. अमेरिकेत 902 अब्जाधीश आहेत. यानंतर चीनचा क्रमांक लागतो, जिथे 516 अब्जाधीश असून यामध्ये हाँगकाँगचाही समावेश आहे. भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे एकूण 205 अब्जाधीश आहेत, ज्यामुळे भारताची श्रीमंत देशांच्या यादीतील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे.

भारताचे स्थान कितवे?
या यादीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख उद्योगपतींमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे सध्या 92.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर अदानी ग्रुपचे गौतम अदानी, जिंदाल कुटुंब, एचसीएलचे शिव नाडर, सन फार्माचे दिलीप संघवी आणि सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांची नावे या यादीत झळकतात.
जगभरातील अब्जाधीशांची ही आकडेवारी पाहता, एक गोष्ट स्पष्ट होते – आर्थिक शक्ती आता फक्त पाश्चिमात्य देशांत मर्यादित राहिलेली नाही. भारतासारखे विकसनशील देशही आता जागतिक संपत्तीच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
इतर देशांचे स्थान-
भारताच्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे, जिथे 171 अब्जाधीश राहतात. त्यानंतर रशिया (140), कॅनडा (76), इटली (74), हाँगकाँग (66), ब्राझील (56) आणि ब्रिटन (55) यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, अल्बेनिया या यादीत पहिल्यांदाच सामील झाला आहे.
जगात जरी 76 देश आणि 2 अर्ध-स्वायत्त प्रदेशांमध्ये अब्जाधीश राहात असले तरी, त्यापैकी 50% लोक फक्त अमेरिका, चीन आणि भारत या तीन देशांमध्ये वास्तव्य करत आहेत. ही बाब भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.