८ फेब्रुवारी २०२५ श्रीनगर : जम्मू-काश्मिरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी करणारे पाकिस्तानातील ७ दहशतवादी तथा सैनिकांचा खात्मा करण्यात लष्करी जवानांना मोठे यश आले आहे.यात कुख्यात अल-बदर या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या व पाकच्या ३ सैनिकांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे.या बेधडक कारवाईमुळे भारतीय चौक्यांवरील हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला आहे.
गेल्या ४ फेब्रुवारीच्या रात्री पुंछ जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यात ‘एलओसी’ वरून घुसखोरीचा प्रयत्न झाला.भारतात घुसल्यानंतर चौक्यांना निशाणा बनवण्याचा त्यांचा डाव होता.त्यामुळे ते चौक्यांच्या दिशेने जात होते. हा प्रकार तिथे पहारा देणाऱ्या जवानांच्या निदर्शनास आला.आपल्या जवानांनी ठोस कारवाई करीत सीमेवरच पाकच्या ७ घुसखोरांना कंठस्नान घातले.
त्यामुळे हल्ल्याचा कट उधळला गेला आहे,असे सूत्रांनी सांगितले.भारतात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोरांमध्ये पाकच्या लष्करातील ‘बॉर्डर अॅक्शन टीम’च्या बहुतांश सदस्यांचा समावेश होता,असे सांगण्यात येत आहे.सध्या काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे.त्यामुळे डोंगरातील मार्ग खुला करण्यात आला आहे.
म्हणून सुरक्षा दलांनी व भारतीय लष्कराने एलओसी तथा जम्मू-काश्मीर अंतर्गत गस्त वाढवली आहे. अशातच घुसखोरीचा प्रकार समोर आला असता जवानांनी कारवाई करीत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. दरम्यान, भारतीय सैनिकांनी एलओसीवर स्फोटके पेरली आहेत. या सोबतच रात्री दिसणारी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक निगरानी व घुसखोरी हाणून पाडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.