पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेतल्यावर भारतानेही जोरदार प्रतिउत्तर दिले. मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून अतिरेक्यांचे तळ नष्ट केले. त्यानंतर सरकारने एअरफोर्सला फ्री-हॅण्ड दिला. त्यानंतर पुन्हा भारताने पाकिस्तानवर दुसरी मोठी कारवाई केली. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले. भारत सरकारने याबाबत अधिकृत पत्रक काढून ड्रोन हल्ला आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचे सांगितले.
पाकिस्तानची क्षेपणास्त्रे नष्ट
ऑपरेशन सिंदूरनंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला. पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत एअरफोर्सला खुली सूट दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. त्यानंतर भारताच्या एस ४०० हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्रे नष्ट केली. रशियाने विकसित केलेली ही प्रणाली आहे. भारताने रशियाकडून ती घेतली आहे.

पाकिस्तानचे मोठे नुकसान
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या 12 शहरांत तब्बल 50 ड्रोन हल्ले केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली. ड्रोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या HQ-9 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली युनिट्सचे मोठे नुकसान करण्यात आहे. लाहोर व्यतिरिक्त, गुजरांवाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर, मियांओ आणि अट्टॉक येथेही असे ड्रोन हल्ले झाले आहेत.
महाराष्ट्रात हाय अलर्ट
पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात हायअलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील महत्त्वाच्या संस्था, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारने देशातील 27 विमानतळ बंद केले आहेत.