१४ फेब्रुवारी २०२५ लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील बुद्धेश्वर परिसरात एका लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. कारण लग्न ऐन रंगात आले असताना तिथे बिबट्याने आपली ऐटदार एण्ट्री मारली आणि जीव वाचवण्यासाठी वधू-वर अनेक तास गाडीतच अडकून राहिले,अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडले.
बुधवारी रात्री बुद्धेश्वर रिंग रोड परिसरातील विवाहस्थळी बिबट्या घुसल्याची घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला आणि पाहुणे जीव
वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावले. लग्नमंडपात उपस्थित वधू-वरांनाही जीव वाचवण्यासाठी त्यांच्या गाडीकडे धाव घ्यावी लागली.

त्यानंतर वनविभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बिबट्याच्या हल्ल्यात वनाधिकारी मुकद्दर अली जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.अथक परिश्रमानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले. एका पाहुण्याने सांगितले की, बिबट्या पकडेपर्यंत दोन्ही बाजूचे कुटुंबे आपापल्या वाहनात बसून राहिले.