बळीराजा 1 फेब्रुवारी रोजी ‘पायी मार्च’ काढणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कृषी कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकरी नेत्यांनी घोषणा केली आहे की, आंदोलक शेतकरी 1 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवरून संसदेच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत.

दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून आम्ही संसदेला धडकणार आहोत, अशी माहिती क्रांतिकारी किसान यूनियनचे नेते दर्शन पाल यांनी दिली आहे.

त्यामुळे आधीच ट्रॅक्टर मार्चमुळे कोंडीत सापडलेल्या केंद्र सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दर्शन पाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी पायी मार्चचं आयोजन केलं आहे. आमची लढाई मोदी सरकार विरोधात आहे.

त्यामुळेच आम्ही संसदेला धडकण्याचा निर्णय घेतला आहे, असं दर्शन पाल म्हणाले. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत,

मात्र कृषी कायदे अद्यापपर्यंत रद्द केले गेले नाहीत. नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी मागील 60 दिवसांपासून शेतकरी कुडकुडत्या थंडीत धरणे प्रदर्शन करत आहेत.