सावधान ! हवामानातील बदलामुळे धोक्याची घंटा वाजणार ?

Mahesh Waghmare
Published:

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : हवामानबदल पृथ्वीच्या जलचक्रावर गंभीर परिणाम करत आहे. २०२४ मध्ये कोट्यवधी लोकांना अतिवृष्टी, भीषण पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागण्यास हाच घटक कारणीभूत आहे,असे एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘२०२४ ग्लोबल वॉटर मॉनिटर रिपोर्ट’ हा अहवाल ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, चीन, जर्मनी आणि इतर देशांतील संशोधकांनी तयार केला आहे. त्यांनी जमिनीवरील स्थानकांमधील आणि उपग्रहांमधील डाटा वापरून मातीतील ओलावा, पर्जन्यवृष्टी यांसारख्या जलपरिस्थितींचे विश्लेषण केले आहे.

जलचक्र म्हणजे काय ?

जलचक्र म्हणजे पाण्याच्या घन, द्रव आणि वायू या तीन अवस्थांत सतत होणारे बदल. हे बदल जमिनीवर, जमिनीत आणि वातावरणात सतत सुरू असतात.
सूर्याची ऊर्जा आणि तापमानातील बदलांमुळे हे चक्र चालते. समुद्र आणि जमिनीवरील पाणी बाष्पीभवनाद्वारे वाफ बनून वायुमंडळात जाते.झाडे मातीतील पाणी शोषून घेतात व ते वाफेच्या स्वरूपात सोडतात, याला उत्सर्जन असे म्हणतात. पाण्याच्या वाफेचे ढगांमध्ये रूपांतर होते आणि पाऊस किंवा हिमवृष्टीच्या स्वरूपात ते पुन्हा जमिनीवर परतते. त्यानंतर पाणी नद्यांमध्ये, तलावांमध्ये किंवा मातीखाली साचून जलचक्र पुन्हा सुरू होते.

होणारा परिणाम

हवामान बदलामुळे जलचक्र अधिक तीव्र झाले आहे.वाढलेल्या तापमानामुळे जास्तीचे पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत जाते आणि उष्ण हवेत जास्तीचे पाणी साठल्यामुळे पावसाची तीव्रता आणि कालावधी वाढून पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. तर काही भागांत पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचा धोका वाढला आहे.जास्त बाष्पीभवनामुळे माती कोरडी होत आहे.

पावसाचे पाणी मातीमध्ये जिरण्याऐवजी नद्या आणि तलावांमध्ये वाहून जाते, त्यामुळे माती कोरडीच राहते. जर देशांनी ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन कमी केले नाही, तर या शतकात तापमान २.६ ते ३.१ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असून, यामुळे जलचक्रात आणखी अनियमितता येईल. २०२२ च्या एका अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे जागतिक जलचक्र ७.४ टक्केने तीव्र झाले आहे, ज्यामुळे अधिक दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या घटनाच्या वाढीला लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe