Milk Price Increased : देशात दिवसेंदिवस दुधाचे दर वाढत चालले आहेत. तसेच आता उन्हाळा सुरु होणार असल्याने दुधाचे दर आणखी कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा दुधाचे दर ५ रुपयांनी वाढले आहेत.
१ मार्चपासून दुधाचे नवीन दर लागू होणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने शुक्रवारी शहरातील म्हशीच्या दुधाच्या दरात 1 मार्चपासून प्रतिलिटर 5 रुपये दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्त दराने दूध खरेदी करावे लागणार आहे.
मुंबई दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सीके सिंग म्हणाले की, शहरातील 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांद्वारे विकल्या जाणार्या म्हशीच्या दुधाची किंमत 80 रुपये प्रति लीटरवरून 85 रुपये प्रति लिटर केली जाईल आणि ती 31 ऑगस्टपर्यंत लागू असेल.
दिवसेंदिवस दुधाच्या मागणीत वाढ होत चालली आहे. दुधाची कमतरता आणि मागणीत वाढ होत असल्याने दरही वाढत आहेत. २०२२ नांतर दुधाच्या दरातील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.
सिंह पुढे बोलताना म्हणाले की, गुरुवारी रात्री उशिरा एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. दुभत्या जनावरांच्या तसेच त्यांच्या खाद्याच्या किमती १५ ते २५ टक्क्यांनी वाढल्याबरोबरच गवत, आणि पेंड दरातही मोठी वाढ झाल्याचे सर्व सदस्यांना वाटले. त्यामुळे दुधाचे दरही वाढवावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई सर्वात मोठे शहर आहे. त्यामुळे या शहरात दुधाची मागणीही जास्त आहे. मुंबईमध्ये दिवसाला ५० लाख लिटर अधिक म्हशीचे दूध लागते. त्यापैकी सात लाखांहून अधिक MMPA द्वारे देशाच्या व्यावसायिक राजधानीत आणि त्याच्या आसपास पसरलेल्या डेअरी आणि शेजारच्या किरकोळ विक्रेत्यांच्या साखळीतून पुरवठा केला जातो.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये, इतर प्रमुख ब्रँडेड उत्पादकांसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख गाय दूध उत्पादकांच्या संघटनांनी गायीच्या दुधाच्या दरात किमान 2 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.