भाजपकडून आपच्या उमेदवारांचा घोडेबाजार : केजरीवाल

Mahesh Waghmare
Published:

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपने आमच्या उमेदवारांचा घोडेबाजार सुरू केला,असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.या आरोपांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केली.

या तक्रारीची दखल घेत उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) चौकशीचे आदेश दिले व ‘एसीबी’चे पथक चौकशीसाठी थेट अरविंद केजरीवालांच्या घरी धडकले.जवळपास दीड तास केजरीवालांच्या घरी चौकशी केल्यानंतर त्यांना कायदेशीर नोटीस दिली व अधिकारी माघारी परतले.त्यामुळे निकालापूर्वीच दिल्लीचे राजकारण तापले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या ७० उमेदवारांची सकाळी साडेअकरा वाजता बैठक घेतली.यावेळी त्यांनी भाजपवर आरोपांचे मोहोळ उठवले.आमच्या १६ उमेदवारांना आता पासूनच प्रलोभने दाखवली जात आहेत.प्रत्येकाला १५ कोटी रुपये देण्याचे वचन कथितरीत्या भाजपकडून मिळत आहे.

भाजपमध्ये प्रवेश केला तर मंत्री बनवण्यात येईल,असे सांगितले जात आहे.दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या हेतूने भाजपने आपच्या उमेदवारांचा घोडेबाजार सुरू केला आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.आपला दिल्लीत ५५ हून अधिक जागा मिळणार असल्याचा दावा काही ‘एक्झिट पोल’च्या संस्थांनी केला.आम्ही सत्तेत येत असल्यामुळे आमच्या उमेदवारांना भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असा टोला त्यांनी लगावला.

‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष बनावट आहेत.आमचा एकही उमेदवार फुटणार नाही,असा दावा केजरीवालांनी केला.त्यानंतर, भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याची मागणी केली.केजरीवालांचे आरोप अतिशय निषेधार्ह आहेत.

त्यांना पराभव दिसू लागला आहे.आपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.हे एक भ्रष्टाचाराचे व लाचखोरीचे प्रकरण आहे.सार्वजनिक क्षेत्रातील लोकांवर आरोप केले जात आहेत.आता त्यांनीसुद्धा परिणाम भोगण्यास तयार राहावे,असे सचदेवा यांनी म्हटले आहे.

केजरीवाल व त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना १५ कोटींचे आमिष दाखवणऱ्यांची नावे व मोबाइल क्रमांक जाहीर करावे.अन्यथा केजरीवालांनी तुरुंगात जाण्यास तयार राहावे,असे आव्हान सचदेवांनी दिले. केजरीवालांचे आरोप बिनबुडाचे असून ते नेहमीच खोटे बोलतात, असा आरोप भाजपचे खासदार अतुल गर्ग यांनी केला.

भाजपच्या मागणीची दखल घेत राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर, एसीबीचे ३ अधिकारी थेट अरविंद केजरीवाल, संजय सिंह व मुकेश अहलावत यांच्या घरी धडकले. यावेळी १५ कोटींचे आमिष दाखवल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe