तब्ब्ल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा डंका ! कोण होणार नवा मुख्यमंत्री ?

Published on -

१८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून येत्या गुरुवारी २० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो.रामलीला मैदानावर शपथ सोहळा पार पडेल.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री या शपथ सोहळ्याला उपस्थित असतील.

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी बैठक होणार आहे.या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केलेल्या नेत्याच्या नावावर या बैठकीत शिक्का मोर्तब होईल.यानंतर गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नव्या सरकारचा शपथ सोहळा पार पडेल, असे सोमवारी सूत्रांनी सांगितले.या सोहळ्यासाठी रामलीला मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.मैदानावर एकूण तीन स्टेज उभारण्यात येत आहेत.

याशिवाय ३० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुघ यांच्याकडे या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.दिल्लीत भाजपची २७ वर्षानंतर पुन्हा सत्ता आली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारचा हा शपथसोहळा भव्यदिव्य प्रमाणात करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक केंद्रीय मंत्री या सोहळ्यात उपस्थित असतील.याशिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना देखील सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार एनडीएच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीत एक बैठक होईल.या बैठकीनंतर हे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ सोहळ्यात सहभागी होतील.

भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून सत्ता मिळवली. मात्र निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप भाजपचा मुख्यमंत्री ठरला नसल्याने काँग्रेस, आपकडून टीका करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे भाजप नेते परवेश वर्मा हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय तसेच स्थानिक नेते पवन शर्मा, आशीष सूद, रेखा गुप्ता, शिखा राय हे देखील शर्यतीत आहेत.इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत देखील भाजप नेतृत्व नवनिर्वाचित आमदारांमधून नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाची संधी देऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe