अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या यू-ट्यूबवरील वक्त्याव्याच्या विरोधात येथील भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख आणि अनंत लोखंडे यांनी 23 जुलै 2021 रोजी नगर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.
त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रियेच्या 156 (3) नुसार कार्यवाही करण्याचा आदेश संबंधित पोलीस ठाण्याला दिला आहे.
तक्रारदारांतर्फे अॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. या अर्जाची दखल घेऊन सात महिन्यांच्या कालावधीनंतर येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश टी. एम. निराळे यांनी नुकताच हा आदेश दिला.
फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे आयोजित कार्यक्रमात सरस्वती यांनी देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी बदनामीकारक तसेच प्रक्षोभक,
समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. ही वक्तव्ये देशाच्या एकात्मतेस व मानवतेस धोका निर्माण करणारी असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती.
यू-ट्यूबवरील व्हिडिओवरून यती नरसिंहनंद सरस्वती यांच्याविरोधात प्रथम पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
आता न्यायालयाने याची दखल घेऊन प्रकरण चौकशी आणि पुढील योग्य त्या कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविले आहे. तेथे आता काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम