१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) च्या पडताळणी संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मधील डेटा नष्ट न करण्याचे आणि डेटा रिलोड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाला दिले.तसेच याप्रकरणी मानक कार्यप्रणाली काय आहे, याची विचारणा न्यायालयाने आयोगाकडे केली आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी ३ मार्च पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होणार आहे.सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. जर पराभूत झालेल्या उमेदवाराला स्पष्टीकरण हवे असल्यास ही विरोधात्मक स्थिती नाही. अशा स्थितीत ईव्हीएमसोबत छेडछाड झाली नसल्याचे अभियंता तपासणीतून दाखवून देऊ शकतो, असे खन्ना यांनी म्हटले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-97.jpg)
ईव्हीएमच्या सत्यापणासाठी धोरण बनवण्याची मागणी करत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्था आणि इतर जणांनी याचिका दाखल केल्या आहेत.ईव्हीएमच्या पडताळणी संदर्भात आयोगाने तयार केलेली मानक कार्यप्रणाली सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०२४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार नसल्याचा युक्तिवाद एडीआरने केला आहे.
आयोगाला आता ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर नष्ट करण्याच्या पूर्ण प्रक्रियेची माहिती न्यायालयात द्यावी लागणार आहे. तसेच एप्रिल २०२४ मध्ये दिलेल्या आपल्या आदेशाचा अर्थ ईव्हीएमचा डेटा नष्ट करा तथा रिलोड करा असा नव्हता. तर निवडणुकीनंतर ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीच्या एखाद्या अभियंत्याने त्या मशीनची पडताळणी करावी असा होता, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.