Big Breaking : इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, परराष्ट्र मंत्रालयाने ‘धक्कादायक’ अशा शब्दांत त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी त्यांची नावे आहेत.
एकेकाळी भारतीय नौदलातील महत्त्वाच्या युद्ध नौकांवर कर्तव्य बजावलेले हे अधिकारी ‘दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या खासगी कंपनीसाठी काम करत होते.
कतारच्या लष्करास प्रशिक्षण तसेच अन्य सेवा पुरवण्याचे काम ही कंपनी करते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इटालियन तंत्रज्ञानावर आधारित मिडगेट पाणबुडीसारख्या अत्यंत संवेदनशील अशा प्रकल्पावर त्यातील काही जण काम करत होते.
ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. मार्चमध्ये त्यांच्यावरील खटल्याच्या कार्यवाहीस सुरुवात झाली. गुरुवारी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
फाशीची शिक्षा धक्कादायक – भारताची प्रतिक्रिया
भारताच्या ८ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा कतार न्यायालयाचा फैसला अतिशय धक्कादायक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. भारतीयांच्या शिक्षेचा विस्तृत निकाल मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
तसेच त्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर मार्ग शोधत असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले. तेथील सरकारने त्यांच्यावरील आरोपांचा खुलासा केलेला नाही. म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे.
त्यामुळे आम्ही खूप हादरलो आहोत. या निर्णयाला आम्ही आव्हान देणार आहोत. सध्या आम्ही शिक्षा झालेल्या नौसैनिकांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.