८ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : महाराष्ट्रासह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेतले जात असलेले विविध आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी फेटाळून लावले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम आणि मतदार यादीत छेडछाड करण्याच्या दाव्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही.
ईव्हीएम मशीन या कोणत्याही स्थितीत हॅक करता येत नाहीत,असे स्पष्ट करत राजीव कुमार यांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली.दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम व मतदार यादीसंदर्भातील आक्षेप विस्तृतपणे खोडून काढले.
मतदार यादीची माहिती प्रत्येक राजकीय पक्षाला दिली जाते.तर ईव्हीएममध्ये छेडछेड करण्याच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांनी जवळपास ४२ वेळेस ईव्हीएम हॅकिंगची बाब फेटाळून लावली आहे.यानंतरही ईव्हीएमवर संशय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरे तर निवडणुकीच्या एक आठवड्यापूर्वी ईव्हीएम तयार केले जातात.
मतदान प्रतिनिधींच्या समोर ईव्हीएम मशीन सील केल्या जातात.ईव्हीएमची प्रक्रिया पूर्ण पारदर्शक पद्धतीने राबवली जाते.ईव्हीएम हे एकदम फुलप्रूफ उपकरण आहे.यात कुठल्याही प्रकारच्या व्हायरसचा शिरकाव होऊ शकत नाही.त्यामुळे अवैध मतदानाचा प्रश्नच येत नाही,असे कुमार म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेतील अखंडता आधोरेखित करत त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या पडताळणीत देखील एकही विसंगती आढळली नसल्याचा दावा केला सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची तपासणी अनिवार्य आहे.
तेव्हापासून ६७ हजारांहून अधिक व्हीव्हीपॅट म्हणजे जवळपास साडेचार कोटींहून अधिक पावत्यांचे सत्यापन करण्यात आले आहे.पण एक मताचे देखील अंतर आढळले नसल्याचे कुमार यांनी म्हटले.तसेच मतदार यादीत फेरफार होत असल्याचे आरोप देखील दुःखद असल्याचे ते म्हणाले.
संपूर्ण दस्तावेज, संबंधितांच्या ठिकाणी जाऊन सत्यापन आणि संबंधित व्यक्तीला सुनावणीची संधी दिल्याशिवाय मतदार यादीतून एकही नाव हटवले जात नाही. मतदार यादीत नाव टाकण्याची आणि काढण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि कठोर असून त्यात मनमानी पद्धतीने बदल करता येत नाही.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक दिशानिर्देशांचे मतदार यादीपासून ते ईव्हीएम हाताळणीपर्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. राजकीय पक्षांनादेखील ही माहिती दिली जाते, असे स्पष्ट करत त्यांनी यासंबंधीचे आरोप फेटाळून लावले.
सोबतच निवडणूक काळात होणाऱ्या तपासणीदरम्यान भेदभाव केला जात असल्याची आणि सायंकाळी ५ वाजेनंतर मतदान वाढण्याची बाबदेखील त्यांनी फेटाळून लावली.उल्लेखनीय बाब म्हणजे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मतदार यादीत फेरफार केले जात असल्याचे आरोप केले होते.
देशात लवकरच एक अब्जहून अधिक मतदार
वर्ष २०२४ हे भारतासह जागतिक स्तरावर निवडणुकींचे वर्ष होते. जगातील दोन-तृतीयांश लोकसंख्येने विविध निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला. देशात ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होत्या.चांगल्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत अनेक विक्रम नोंदविण्यात आले.
आयोगाने सोमवारीच मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार भारत ९९ कोटी मतदारांचा टप्पा पार करत आहे. लवकरच आपण एक अब्ज मतदार असलेला देश बनू, जो की एक विक्रम असेल, असे कुमार म्हणाले. तसेच महिला मतदारांची संख्या देखील जवळपास ४८ कोटी होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
आरोपांना शायरीतून उत्तर
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सातत्याने केल्या जात असलेल्या आरोपांना शायरीच्या माध्यमातून उत्तर दिले. आरोपों और इल्जामात का दौर चले, कोई गिला नाही; झूठ के गुब्बारों को सहारा मिलें, कोई शिकवा नहीं; हर नतीजे में प्रमाण दिया गया है; पर वो शक की नई दुनिया खोजते हैं और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं!’, असे कुमार म्हणाले.