२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील गरजवंतांना ‘केजी टू पीजी’ पर्यंतचे शिक्षण मोफत देणे, ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांना १० लाखांचा विमा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (पीसीएस) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन प्रयत्नांसाठी एकरकमी १५,००० रुपयांची आर्थिक प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा भाजपने मंगळवारी केली. दिल्लीकरांच्या आरोग्य, वाहतूक, वीज, पाणी व परिवहन संबंधित समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपने दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीरनाम्याचा दुसरा भाग पत्रकार परिषदेत जाहीर केला. यात, त्यांनी दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला. ठाकूर म्हणाले की, भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली तर आम्ही दिल्लीकरांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू करणार आहोत.

डॉ. भीमराव आंबेडकर विद्यावेतन योजनेअंतर्गत आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) आणि तंत्रनिकेतन कौशल्य केंद्रात तांत्रिक अभ्यासक्रमाचे धडे घेणाऱ्या अनुसूचित जाती समुदायातील (एससी) विद्यार्थ्यांना दरमहा १,००० रुपये देण्यात येईल.यासोबतच ऑटोरिक्षा चालकांना १० लाखांचा लाख आयुर्विमा व टॅक्सी चालकांसाठी ५ लाखांचा अपघात विमा देत या दोन्ही घटकांसाठी ऑटो-टॅक्सीचालक कल्याण मंडळ तसेच घरगुती कामगारांसाठी सुद्धा असेच एक मंडळ स्थापनेचे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी दिले.
या चालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती तसेच ६ महिन्यांच्या पगारी मातृत्व रजा देण्याचे वचन त्यांनी दिले. दुसरीकडे, भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली तर आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारमधील अनियमितता व घोटाळ्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करणार आहोत.दिल्लीत जल जीवन मिशन लागू करण्यात आप ला अपयश आले.
पण, पायाभूत संरचनेत सुधारणा व कल्याणासाठी भाजप कटिबद्ध आहे. आम्ही विकसित भारताची कल्पना केली आहे. यात विकसित दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे अनुराग ठाकूर यांनी नमूद केले.याचवेळी दिल्लीत मोदी गॅरंटीचे पोस्टर झळकले आहेत.
दरम्यान, महिलांना दरमहा २५०० तर ५०० रुपयांत गॅस व दिवाळी व होळीला प्रत्येकी एक गॅस सिलिंडर मोफत, गरोदर महिलेला २१ हजार रुपये, ६ पोषण आहार किट, झोपडपट्टी वासीयांना ५ रुपयांत पौष्टिक भोजन देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात दिले आहे.