उन्हाळ्यात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. उन्हामुळे वारंवार भूक आणि तहान लागत असल्याने अनेक प्रवाशांना महागडे पदार्थ खरेदी करणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने “इकोनॉमी मील वेंडिंग” सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर कमी किमतीत जेवण आणि पिण्याचे पाणी सहज मिळणार आहे.
इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवासी महागड्या खाद्यपदार्थांमुळे उपाशी राहतात, त्यामुळे त्यांना प्रवासात त्रास होतो. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर “इकोनॉमी मील” अंतर्गत कमी किमतीत चांगल्या प्रतीचे जेवण आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे.

रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ आणि शीतपेयांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रशासनाने दररोज विक्रेत्यांची तपासणी सुरू केली आहे. याशिवाय, रेल्वे प्रशासनाने १-लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी जास्तीत जास्त १५ रुपये आकारण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, वेंडिंग स्टॉल्सवर मिळणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) च्या नियमांनुसार तपासली जात आहे.
नागपूर रेल्वे विभागाने प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला आहे. पांढुर्णा, वणी, धामणगाव आणि आमला या स्थानकांवर ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली असून, तिथे गरजू प्रवाशांना मोफत पाणी पुरवले जात आहे.
खाद्यपदार्थ आणि स्वच्छतेसंदर्भात कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी केटरिंग सेवा पुरवणाऱ्या विक्रेत्यांसोबत विशेष बैठकांचे आयोजन केले आहे. प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी यासाठी विक्रेत्यांना स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, प्रवाशांना अन्न किंवा पिण्याच्या पाण्याबाबत तक्रार करायची असल्यास रेल्वे अधिकाऱ्यांकडे किंवा हेल्पलाईन नंबरवर नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामुळे प्रवास अधिक सुसह्य होईल आणि प्रत्येक प्रवाशाला दर्जेदार सेवा मिळेल.