India News : चीनमध्ये आढळलेल्या गंभीर संसर्गजन्य न्यूमोनियाचा भारतात एकही रुग्ण नसून चिंतेचे कारण नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. वर्षभरात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यापैकी एकाही नमुन्यात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा विषाणू आढळला नसल्याचे सरकारने सांगितले.
दिल्लीतील एम्स रुग्णालयात चीनमधील न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळल्याचा दावा एका राष्ट्रीय दैनिकातील बातमीत करण्यात आला होता. यावरून चीनमधील श्वसनाच्या संसर्गाच्या गंभीर आजाराचा भारतातही शिरकाव झाल्याचे म्हटले गेले.
परंतु गुरुवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून हे वृत्त फेटाळले आहे. दिल्लीतील एम्समध्ये चीनमधील न्यूमोनियाच्या संसर्गाचे सात रुग्ण आढळल्याचा दावा तथ्यहीन आहे. संबंधित माहिती पूर्णपणे चुकीची आहे.
एम्सच्या मायक्रोबायोलॉजी विभागात वर्षभरात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामधील एकाही नमुन्यात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचे विषाणू आढळले नाहीत. उपचार घेत असलेल्या सात रुग्णांना सामान्य न्यूमोनिया असून चीनसह जगातील काही देशांमध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या रुग्णवाढीशी त्यांचा काहीही संबंध नाही.
त्यामुळे चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. चीनमध्ये न्यूमोनियाच्या एका विषाणूने थैमान घातले आहे. प्रामुख्याने लहान मुलांना याचा संसर्ग होत आहे. श्वसनाशी संबंधित या आजारामुळे मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
त्यामुळे रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. या श्वसन विकाराच्या संसर्गाची तीव्रता लक्षात घेत केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. फुफ्फुसांमध्ये जळजळ, खूप ताप, सर्दी, खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत.
वेदनाशामक मेफ्तालच्या दुष्परिणामांबाबत प्रशासनाचा इशारा
औषधांचे मापदंड निश्चित करणाऱ्या भारतीय फार्माकोपिया आयोगाने (आयपीसी) मेफ्ताल या वेदनाशामक औषधाच्या दुष्परिणामांबाबत इशारा दिला आहे. डॉक्टरांनी आणि रुग्णांनी या औषधाच्या प्रतिकूल परिणामांवर लक्ष ठेवावे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
मासिक पाळीच्या काळात महिलांना पायात गोळे येणे आणि संधिवाताच्या त्रासावर वेदनाशामक म्हणून मेफॅनिक अॅसिड हे औषध सहसा डॉक्टरांकडून दिले जाते. अनेक लोक स्वतः च मेडिकलमध्ये जाऊन ही मेफ्तालची गोळी घेतात.
ताप, दातदुखीवर देखील ही गोळी घेतली जाते. परंतु या औषधाचे काही दुष्परिणाम समोर आल्याचे आयपीसीने म्हटले आहे.