चलनातून बंद करण्यात आलेल्या २,००० रुपयांच्या एकूण ९३ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी सांगितले. आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.
रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार, बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत बँकांमध्ये जमा केलेल्या २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी रुपये होते.
याचा अर्थ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी २,००० रुपयांच्या फक्त ०.२४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. प्रमुख बँकांकडून गोळा केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की २,००० रुपयांच्या सुमारे ८७ टक्के नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या होत्या,
तर १३ टक्के नोटा इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय आहे की, ३१ मार्च २०२३ रोजी चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.६२ लाख कोटी रुपये होते, जे १९ मे २०२३ रोजी नोटा काढण्याच्या घोषणेच्या वेळी ३.५६ लाख कोटी रुपयांवर खाली आले.
आरबीआयने लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये २,००० हजार रुपयांच्या नोटा जमा कराव्यात किंवा त्या इतर मूल्यांच्या नोटांसह बदलून घ्याव्यात.