IMD Rain Alert : देशात सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरु असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच आजही भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पावसासह अनेक भागात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच येत्या काही दिवसांत उष्णतेत देखील प्रचंड वाढ होऊन उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. तापमानात चढ-उतार कायम आहे. येत्या काही दिवसांत नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.
गेल्या काही दिवसांपासुन अनेक राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुसकान झाले आहे. ऐन रब्बी पिकांच्या काढणी वेळी आलेल्या पावसाने फळबागा, गहू, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, यंदा तापमानात झपाट्याने बदल झाला आहे. सामान्यपेक्षा 5 ते 6 अंशांनी अधिक तापमानाची नोंद होत आहे. महत्वाचे म्हणजे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या वाढीसोबतच उष्णतेची लाटही सुरू झाली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही कोकण, गोवा आणि किनारी कर्नाटकात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या जवळ जाणार आहे. IMD नुसार, आज आणि उद्या हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सोमवार, 12 मार्च रोजी काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशातील अनेक भागातील हवामानात बदल झाला आहे.
स्कायमेट हवामान खात्यानुसार झारखंड, दक्षिण बिहार, ईशान्य भारतातील उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, किनारी ओडिशा, मणिपूर, त्रिपुरा अंदमान आणि निकोबार बेटांच्या अनेक भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत वायव्य, पश्चिम आणि मध्य भारतात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊ शकते आणि त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता आहे.