२३ जानेवारी २०२५ नाशिक : भारतीय तोफखान्याच्या भात्यातील बोफोर्स, धनुषसह अन्य १५५ मिमी तोफांमधून डागलेले तोफगोळे क्षमतेपेक्षा १५ ते २० किलोमीटर अधिक अंतरावर मारा करू शकतील,असे तंत्रज्ञान मद्रास आयआयटीने विकसित केले आहे.
नियमित तोफगोळ्याच्या खालील भागात ‘रॅमजेट’ कवच बसवून तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत नेण्याची तयारी केली जात आहे.यासंदर्भातील माहिती देवळाली कॅम्प स्थित तोफखाना स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात देण्यात आली.
यावेळी तोफखाना रेजिमेंटचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना उपस्थित होते.नव्या स्वदेशी तंत्रज्ञानाने आगामी काळात तोफांच्या माऱ्याला अधिक भेदक स्वरूप प्राप्त होणार आहे.तोफांची मारक क्षमता उंचावण्यासाठी संशोधनाची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाने मद्रास आयआयटीवर सोपवली होती.
या संस्थेने रॅमजेट हे विशिष्ट प्रकारचे कवच तयार केले, जे तोफगोळ्याच्या मागील बाजूस लावले जाते.त्यामध्ये प्रणोदक (प्रोपेलंट तोफगोळा ) असतात. डागताना मागील बाजूला उडणाऱ्या ठिणग्यांनी गरम हवा आत जाऊन ते प्रज्वलित होतात आणि अधिक शक्ती देऊन पल्ला वाढवतात.
तोफखाना स्कूलच्या फायरिंग रेंजवर त्याची यशस्वीपणे चाचणी झाली आहे. यात आणखी सुधारणा केल्या जात असून पुन्हा चाचण्या घेण्यात येणार आहेत. तोफांचा पल्ला उंचावणारे हे तंत्रज्ञान सध्या जगात कोणाकडेही नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.युद्धात संपूर्ण खेळ बदलणारे हे तंत्रज्ञान असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.