१५ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित लाचखोरीच्या मुद्द्यावर देशात मौन बाळगतात अन् विदेशात गेले असता याच लाचखोरीला वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगतात,असा टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लगावला आहे.लाचखोरी व देशाची संपत्ती लुटणे हे मोदींसाठी वैयक्तिक प्रकरण बनले आहे,अशी खोचक टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वॉशिंग्टन येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली.यावेळी गौतम अदानी यांच्या लाचखोरीबाबत पत्रकारांनी विचारले असता हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे सांगत मोदींनी वेळ मारून नेली.या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.ते ट्विटरवरून म्हणाले की,अदानींच्या लाचखोरीसंबंधी देशात प्रश्न विचारला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगतात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/7-2.jpg)
मात्र विदेशात याबाबत विचारले असता याच लाचखोरीला ते वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगतात.अमेरिकेतही मोदींनी अदानींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकला आहे,असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला.मोदींना त्यांच्या मित्राचा खिसा भरणे हे राष्ट्र निर्माणासारखे काम आहे.पण, लाचखोरी व देशाच्या संपत्तीवर डल्ला मारणे हे वैयक्तिक प्रकरण बनते,असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
अमेरिकेत मोदी म्हणाले की, भारत एक लोकशाहीप्रधान देश आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आपली संस्कृती आहे.आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो.प्रत्येक भारतीयाशी माझे घनिष्ठ नाते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना वैयक्तिक प्रकरणांवर चर्चा केली जात नाही, असे मोदींनी सांगितले या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.