मोदींच्या हस्ते आज ‘मिशन मौसम ‘चे उद्घाटन

Mahesh Waghmare
Published:

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (आयएमडी) १५० व्या स्थापना दिनाच्या औचित्यावर ‘मिशन मौसम’चे उद्घाटन करणार आहेत.हवेच्या गुणवत्तेबाबतची आकडेवारी गोळा करण्यात या मिशनमुळे मदत होणार आहे.

दिल्लीतील भारत मंडपमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ‘मिशन मौसम’चे उद्घाटन केल्यानंतर मोदी उपस्थितांना संबोधित करतील.शिवाय याप्रसंगी ते हवामान विभागाने तयार केलेल्या ‘आयएमडी व्हिजन-२०४७’च्या दस्तावेजाचे अनावरण देखील करतील.अत्याधुनिक हवामानवेधी तंत्रज्ञान व प्रणालीचा विकास करत भारताला हवामान व वातावरणप्रती सजग देश बनवणे हे मिशन मौसमचे उद्दिष्ट आहे.

मिशन मौसम अंतर्गत उच्च दर्जाची वातावरणीय निरीक्षणे नोंदवणे, पुढील पिढीचे रडार, उपग्रह आणि उच्च कार्यक्षमतेचे संगणक बसवले जातील.याद्वारे हवामान व वातावरणातील प्रक्रियांचे आकलन सुधारण्यावर भर दिला जाईल.सोबतच हवेच्या गुणवत्तेबद्दल आकडेवारी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल.याच्या मदतीने हवामान व्यवस्थापनासंबंधीचे धोरण बनविण्यास मदत होणार आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मिशनला मंजुरी देण्यात आली होती.दोन वर्षांत जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा खर्च यावर केला जाणार आहे.मिशन मौसममुळे कृषी, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण, उड्डायन, जलसंसाधन, वीज, पर्यटन, नौवहन, परिवहन आणि आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रांना थेट लाभ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe