India News : भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह पळून आलेल्या महिलेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता तिचा पती देखील समोर आला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपल्या पत्नीला मायदेशी पाठवण्याची विनंती केली आहे.
ही महिला मात्र पाकला परत जाण्यास तयार नाही. परत गेले तर आपली हत्या होईल, अशी तिला भीती आहे. सीमा गुलाम हैदर असे या ३० वर्षीय पाकिस्तानी महिलेचे नाव आहे. २५ वर्षीय सचिन मीणा या आपल्या प्रियकरासाठी ती आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली.

या दोघांना ४ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. पाकिस्तानातही ही बातमी पोहोचल्यानंतर आता या महिलेचा पती गुलाम हैदर याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओद्वारे गुलामने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून आपली पत्नी व मुलांना मायदेशी पाठवण्याची विनंती केली आहे.
भारतात येण्यासाठी आपल्या पत्नीला फूस लावण्यात आल्याचा आरोपही त्याने केला. सीमासोबत आपला प्रेमविवाह झाला आहे. तिच्या अटकेबद्दल भारतीय प्रसारमाध्यमांमधून समजले. सीमा घर विकून आणि दागिने घेऊन भारतात गेली आहे, असे हैदरने सांगितले.
तो सध्या नोकरीनिमित्त सौदी अरेबियात आहे. दरम्यान, भारतात घुसखोरीचा आरोप असलेली सीमा आणि परदेशी नागरिकाला अवैधरीत्या आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या सचिनला ग्रेटर नोएडातील न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. या दोघांनी लग्न करून सोबत राहू देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.