MPSC Results 2023 : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. प्रयत्न आणि कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते हे तुम्ही अनेकदा पाहिलेही असेल आणि अनुभवले देखील असेल. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवाणी गावातील एका मजुराची मुलगी MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे.
ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि कष्ट तर केलेच पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. मात्र त्यातील मोजकेच विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण होतात. पण महाराष्ट्रातील एका मजुराच्या मुलीने MPSC परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या छोट्याशा गावातील शालू शामराव या मुलीने अडचणींचा सामना करून MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. शालू हिने अनुसूचित जमाती प्रवर्गातून क गट परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शालूला MPSC परीक्षा पास झाल्यांनतर उद्योग निरीक्षक पद मिळाले आहे. त्यामुळे तिचे आई वडील तिच्या यशावर खूपच खुश झाले आहेत. त्यांना त्यांच्या मुलीने मिळवलेल्या यशावर अभिमान वाटत आहे.
वडील मजूर आहेत
MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शालूचे वडील मजुरीचे काम करतात. दररोज मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शालू ही एक गरीब कुटुंबातील मजुराची मुलगी असल्याने तिला शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्या.
मात्र शालूने हिंमत हारली नाही. तिने प्रत्येक अडचणींचा सामना करत जिद्दीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आणि MPSC परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून क गट परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शालूने आपले सुरुवातीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. यानंतर आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथून इंटरमिजिएट उत्तीर्ण झाली. ज्ञानेश कॉलेज नवरगाव येथून B.Sc ची पदवी घेतली. सध्या ती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
B.Sc ची पदवी घेतल्यानंतर शालूने नेचर फाऊंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे कोचिंग घेतले. शालूने मेहनत आणि कष्ट करत BrightEdge Foundation कडून शिष्यवृत्ती मिळवली. त्यांनतर शालू स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागली. याच जोरावर तिने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
शालूचे कुटुंबीय तर कुश झालेच मात्र गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी शालूचे धुमधडाक्यात स्वागत देखील केले. गावकऱ्यांनी फुल, हार, बँड आणि वाद्यांच्या गजरात शालूचे गावात स्वागत केले. या सर्व यशाचे श्रेय शालूने तिच्या पालकांना दिले आहे.