शेअर मार्केटकडे लोकांची पाठ ! या ठिकाणी होतेय सर्वाधिक गुंतवणूक ; मिळतोय जबरदस्त परतावा

Mahesh Waghmare
Published:

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : शेअर बाजारात पडझडीचे वातावरण असतानाही जानेवारी महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांत ३९,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. लघु आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्सशी जोडलेल्या योजनांमध्ये भांडवलाचा ओघ वाढल्यामुळे एकूण गुंतवणूक वाढली आहे. परंतु ही निव्वळ गुंतवणूक डिसेंबरमधील ४१,१५६ कोटी रुपयांपेक्षा ३.५ टक्के कमी आहे. गुंतवणूकदारांचा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये सातत्याने गुंतवणुकीचा जानेवारी हा सलग ४७ वा महिना आहे.सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अर्थात एसआयपीमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात २६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली.

जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्ये २६,४०० कोटी रुपये गुंतवले.डिसेंबरमध्ये २६,४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती,असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता डिसेंबरमधील ६६.९३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून जानेवारी अखेरीस ६७.२५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. कर्ज निधीमध्ये १.२८ लाख कोटी रुपये गुंतवले गेले. डिसेंबरमध्ये १.२७ लाख कोटी रुपये काढले गेले.क्षेत्रीय इक्विटी योजनांमध्ये सर्वाधिक ९,०१६ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली.

डिसेंबरमधील १५,३३१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. मिडकॅप श्रेणीमध्ये ५,१४८ कोटी रुपये आणि स्मॉलकॅप श्रेणीमध्ये ५,७२१ कोटी रुपये गुंतवणूक झाली.मोठ्या कंपन्यांच्या समभागांशी जोडलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक डिसेंबरमध्ये २,०१० कोटी रुपयांवरून वाढून ३,०६३ कोटी रुपयांवर गेली आहे. मोठ्या आणि मध्यम कंपन्यांच्या समभागांशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी ४,१२३ कोटी रुपये गुंतवले आहेत.

स्मॉल-मिडकॅप योजनांकडे आकर्षण

म्युच्युअल फंडांच्या स्मॉल आणि मिडकॅप योजना गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठी सुधारणा दिसून आली.म्हणूनच गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेण्याचा आणि या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय निवडला असल्याचे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहयोगी संचालक आणि व्यवस्थापक (संशोधन) हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe