६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा ‘आप’त्ती असा उल्लेख करत जनतेला आपत्ती नव्हे तर विकास हवा, असे वक्तव्य केले.
यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार आणि सुशासन येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपची सत्ता आल्यानंतर जनकल्याणाच्या कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत, असे आश्वासनही मोदींनी दिले.
पंतप्रधानांनी रविवारी दिल्लीत १२ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केले.यानंतर रोहिणी परिसरात भाजपच्या परिवर्तन सभेला संबोधित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.या वेळी त्यांनी सत्ताधारी आपवर सडकून टीका केली.
गेली १० वर्षे दिल्लीकरांनी आपत्ती सोसली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई तर हिवाळ्यात प्रदूषणाचा फटका दिल्लीकरांना बसतो. त्यामुळे त्यांना आता आपत्ती नको तर विकास हवा आहे आणि हा विकास केवळ भाजपच करू शकतो, असे नमूद करत त्यांनी भाजप विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
केंद्र सरकार काम करू देत नसल्याचा, निधी देत नसल्याचा आपचा आरोपही मोदींनी फेटाळून लावला. तसेच केजरीवालांच्या बंगल्याचा शिशमहाल असा उल्लेख करत यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची टीका केली.
भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे.अशावेळी एका विकसित राष्ट्राला साजेशी राजधानी म्हणून दिल्लीचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, मोदी म्हणाले.