Devi Singh Shekhawat : दुःखद! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Devi Singh Shekhawat : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 89 होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान होते. माजी आमदार देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर होते. अनेक कामे त्यांनी मार्गी लावली होती. यामुळे त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह 7 जुलै 1965 रोजी झाला होता. त्यांनी 1972 मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. याचा उपयोग त्यांनी शिक्षण क्षेत्रात केला.विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते.

देवीसिंह शेखावत 1985 मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. शेखावत हे १२ फेब्रुवारीच्या पहाटे पुण्यातील त्यांच्या घराच्या बाहेर घसरून पडले असल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु नंतर उच्च रक्तदाब, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका यामुळे त्यांचे निधन झाले.