अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु आहेत.
काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे बाबासाहेब पुरंदरेंचे मुलगे अमृत पुरंदरे यांनी सांगितले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.
पुरंदरे यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या कोथरूड येथील घरात ते पाय घसरून पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला इजा झाली.
आज साडे आठच्या सुमारास रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन येत असून त्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती मिळणार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले.
त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत,
गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम