प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी टायरी बॉयस आणि त्याची गर्लफ्रेंड नेटली यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
ग्रेगरीच्या भावाला त्याच्या घरी हे दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी त्यांना पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. या पावडरमुळेच त्यांचा मृत्यू झाला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार ग्रेगरी आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू आठवडाभरापूर्वी झाला होता. त्यांचे मृतदेह तब्बल एक आठवडा घरातच पडून होते.
ग्रेगरीचा भाऊ जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने दरवाजाबाहेर पडलेली वृत्तपत्र आणि काही पेपर्स पाहिले. त्यानंतर त्याने घरात प्रवेश केला.
तेव्हा हॉलमध्येच त्याने दोघांचे मृतदेह पाहिले. ग्रेगरी ‘ट्विलाईट’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला होता. त्याने या चित्रपटात टेलर क्राऊली ही व्यक्तिरेखा साकारली होती.
या चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्याने ‘अपॉकेलप्स’ या एकमेव चित्रपटात काम केले. त्याला चित्रपटात काम मिळत नव्हते त्यामुळे काही काळ तो डिप्रेशनमध्ये देखील गेला होता.