नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल जवळपास आला आहे. यात आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी घेत तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या दिमाखदार विजयानंतर अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘आम आदमी पक्षा’चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या सुरेंद्र सिंह यांना आमदारकी गमवावी लागली आहे. दिल्ली कँटॉन्मेंट या आपल्याच मतदारसंघातून सुरेंद्र सिंह निवडणूक लढवत होते. मात्र इथे ‘आप’चे वीरेंद्रसिंह कडियान विजयी झाले, तर भाजपचे मनिष सिंह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कडियान यांना जवळपास 26 हजार, तर मनिष सिंह यांना अंदाजे 17 हजार मतं मिळाली.
दिल्ली कँटॉन्मेंट मतदारसंघात काँग्रेस उमेदवार तिसऱ्या, तर बसप उमेदवार चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीचे सुरेंद्र सिंह यांना अवघी 854 मतं मिळाली. विद्यमान आमदाराला जनतेने नाकारल्यामुळे उमेदवारापेक्षा पक्षाला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे.