१५ मार्च २०२५ केपटाऊन : आफ्रिका खंडातील इथिओपियाच्या वाळवंटात २००५ मध्ये सुमारे ५६ किलोमीटर लांबीची दरी निर्माण झाली होती. तेव्हापासून ती दरवर्षी अर्धा इंच वेगाने रुंदावत आहे. अशा विभाजनाला लाखो वर्षे लागतील, असा संशोधकांचा कयास होता; परंतु कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक केन मॅकडोनाल्ड यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने १० ते ५० लाख वर्षांत खंडाचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हिंदी महासागराचे पाणी घुसून या पूर्व आफ्रिकेच्या दरीत पूर येऊ शकतो, जर या दरीत पाणी वाहत राहिले तर त्याची खोली अटलांटिक महासागराइतकी खोल होऊ शकते. ही दरी सोमालिया, केनिया, टांझानिया आणि इथिओपियाच्या अर्ध्या भागात पसरली आहे.त्यामुळे नवीन ‘न्यूबियन खंड’ तयार होईल, असा इशाराही मॅकडोनाल्ड यांनी दिला आहे.

हे दोन्ही भाग अत्यंत मंद गतीने लांब जात आहे असे वाटते; परंतु आफ्रिका खंडाच्या प्रचंड आकारामुळे तसे वाटते. मानवी जीवनमानाच्या बाबतीत, तुम्हाला फारसे बदल दिसणार नाहीत. तुम्हाला भूकंप जाणवतील, तुम्हाला ज्वालामुखी फुटताना दिसतील; परंतु तुम्हाला मध्ये एक मोठा महासागर तयार होतोय, याची कल्पना येणार नाही, असे मॅकडोनाल्ड म्हणतात.
ही दरी पूर्व आफ्रिकेतील २.२ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या ३,२१९ किलोमीटर लांबीच्या दरीचाच एक भाग आहे. याच भागात खंडातील अनेक विशाल तलाव अस्तित्वात आहेत. या प्रदेशात सोमाली आणि न्युबियन या दोन टेक्टोनिक प्लेट (भूस्तर) आहेत, ज्या एकमेकांपासून सक्रियपणे दूर जात आहेत. पृथ्वीच्या गाभ्यातील वाढत्या उष्णतेमुळे अंशतः वितळलेल्या खडकाच्या मंद, वर्तुळाकार हालचालींमुळे हे भूस्तर एकमेकांपासून दूर जात आहेत, असे काही संशोधकांना वाटते.
व्हर्जिनिया टेकच्या २०२० च्या अभ्यासात संशोधकांनी असे सुचवले आहे की, दरीच्या उत्तरेकडील भागात प्रथम नवीन महासागर तयार होतील. ‘विस्ताराचा दर उत्तरेकडे सर्वात वेगवान आहे, म्हणून आपल्याला प्रथम तेथे नवीन महासागर तयार होताना दिसेल,’ असे भूविज्ञान विभागाच्या प्राध्यापक डी. सारा स्टॅम्प्स म्हणाल्या.