India’s First AI School : आर्टिफिशियल इंटेनिजन्स (एआय) या सध्या जगभर गाजत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आता पारंपरिक शाळांचे स्वरूपही बदलणार आहे. त्याची चुणूक नुकतीच दिसली आहे. भारतात केरळ राज्यायातील तिरुवअनंतपुरममध्ये देशातील पहिली एआय आधारित शाळा सुरू झाली आहे.
हे ‘एआय स्कूल’ अमेरिकेची ‘आयलर्निंग इंजिन’ आणि वेदिक ई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमातून साकारण्यात आली आहे. सध्या तरी या एआय स्कूलमध्ये सर्वसामान्य शाळांप्रमाणे शिक्षक असणार आहेत. मात्र विद्याथ्र्यांना एआय आधारित विविध टूल्सच्या साह्याने शिकविले जाणार आहे.
या एआय स्कूलमध्ये अभ्यासक्रम आरेखन, व्यक्तिगत शिक्षण, मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये एआय टूल्सचा वापर करण्यात येणार आहे.
मुलांना एआयच्या मदतीने प्रगत साधने आणि संसाधन दिली जातील ज्याचा मदतीने ते भविष्यातील आव्हानांसाठी तयार होतील. एआयच्या साह्याने शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार आहे आणि मुले खूप काही शिकू शकतील, असा दावा शाळेच्या संचालक मंडळाने केला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेले हे एआय स्कूल ८ वी ते १२ वीपर्यंतच्या मुलांसाठी असेल. शाळेत, मुलांना एकापेक्षा जास्त शिक्षक, चाचणीचे वेगवेगळ्या पातळ्या, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मृती तंत्र याबद्द्ल माहिती दिली जाते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, गटचर्चा, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी आणि भावनिक कल्याण याबद्दलही माहिती दिली जाते.