जास्त स्क्रीन टाइम धोक्याचा

Published on -

१५ मार्च २०२५ : नवी दिल्ली : स्क्रीनचा (टीव्ही, स्मार्टफोन) जास्त वापर मुलांच्या भाषा शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. लहान मुलांना पुस्तकांची गोडी लावणे आणि घरातील मोठ्यांसोबत माहितीपूर्ण स्क्रीन शेअर केल्यास मुलांच्या भाषा कौशल्यात सुधार होऊ शकतो असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे.

२० लॅटिन अमेरिकन देशांतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात १२ ते ४८ महिने वयोगटातील १,८७८ लहान मुलांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये पालकांना विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे मुलांचा स्क्रीन टाइम, पुस्तकांचे आकर्षण, भाषा विकास आणि इतर पैलू तपासण्यात आले. याव्यतिरिक्त, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, पालकांचे शिक्षण आणि नोकरीचा देखील आढावा घेण्यात आला.

पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे आढळून आले की, लहान मुलांसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम म्हणजे टीव्ही, जे दररोज सरासरी एक तासापेक्षा जास्त काळ पाहिले जाते. यामुळे मुलांमध्ये भाषा विकास मंदावू शकतो.टीव्हीवर मुलांनी मनोरंजन कार्यक्रम सर्वाधिक पाहिला तर संगीत आणि शैक्षणिक कार्यक्रम दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांमध्ये पुस्तके आणि शैक्षणिक संसाधनांचा वापर कमी असल्याचे आढळून आले.

मुलांचे भाषा विकास कौशल्य करते कमी

ज्या मुलांचा जास्त स्क्रीन टाइम असतो त्यांच्याकडे मर्यादित शब्दसंग्रह असतो आणि त्यांना भाषा कौशल्याचे महत्त्वाचे टप्पे गाठण्यास विलंब होऊ शकतो.
दुसरीकडे, ज्या मुलांनी पुस्तके जास्त वाचली किंवा प्रौढांसोबत स्क्रीन पाहिल्या त्यांच्यात चांगल्या प्रकारचे भाषा कौशल्य आढळले हे विशेष. स्क्रीन वापर आणि मुलांच्या शारीरिक विकासामध्ये कोणताही ठोस संबंध आढळला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News