Turkey Earthquake : सध्या तुर्कीमध्ये कालपासून भूकंपाचे धक्के बसणं चालूच आहे. यामुळे येथील नागरिक घाबरले आहेत. याठिकाणी कालपासून तब्बल 40 वेळा भूकंप झाला असून 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घर यामध्ये जमीनदोस्त झाली आहेत.
तसेच आतापर्यंत 8 हजाराहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. तुर्कीमध्येही पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याची डेप्ट ही 18 किमीची होती. यामध्ये अनेक इमारती डोळ्यासमोर जमीनदोस्त झाल्या.
अनेकांचे मृतदेह अजूनही अडकले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. गाझियनटेप हे भूकंपस्थानापासून सीरिया हा देशही जवळ आहे. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता तुर्की आणि सीरियामध्ये जाणवली.
या भूकंपाचा फटका सर्वच प्रमुख शहरांना बसल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे पडल्याने राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
दरम्यान, या भूकंपाचा अंदाज तीन दिवसांपूर्वी वर्तवला असल्याची माहिती आहे. युरोपातील एका शास्त्रज्ञाने आज नाही तर उद्या, पण लवकरच या भागात 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप येणार आहे, असे म्हटले होते.