मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा आणि उच्चभ्रू परिसर मानला जातो. या परिसरात जमीन आणि मालमत्तेची किंमत आता सोन्यापेक्षाही जास्त आहे. देशातील मोठ मोठे उद्योजक आणि व्यवसायिक येथेच राहतात. गोदरेज, रुईया, जिंदाल यांसारखे श्रीमंत कुटुंब येथे राहतात. एवढ्या महागड्या परिसरात एक असा बंगला आहे जिथे बसून देशाचे दोन तुकडे करण्याचा कट रचला गेला. होय, भारताच्या शत्रूचा बंगलाही येथेच आहे. विशेष म्हणजे त्या बंगल्याची किंमत आहे 2600 कोटी रुपये…
कुणाचा आहे बंगला?
हा बंगला दुसरा तिसरा कुणाचा नसून पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिन्ना यांचा आहे. याच बंगल्यातून आठ दशकांपूर्वी भारताचे दोन तुकडे करण्याचा कट रचला गेला होता. या बंगल्याचे नाव आहे ‘दक्षिण कोर्ट’. एकेकाळी तो ‘जिना हाउस’ म्हणूनही प्रसिद्ध होता. परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यानंतर जिना यांनी वकिलीला सुरुवात केली. काही दिवस मुंबईत एका छोट्याशा घरात राहिल्यानंतर त्यांनी स्वतःचा बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये असलेले आलिशान घर विकून जिन्नांनी मुंबईत हा बंगला बांधला.

कधी केले बांधकाम?
मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील हा बंगला 1936 मध्ये बांधला. अडीच एकरात पसरलेला हा बंगला युरोपियन शैलीत बांधलेला आहे. त्यांनी हा बंगला बांधण्याची जबाबदारी त्या काळातील प्रसिद्ध वास्तुविशारद क्लॉड बेटली यांच्यावर सोपवली होती. बेटली हे भारतीय वास्तुकला संस्थेचे अध्यक्षही होते.
किती आला खर्च?
बेटलीने या बंगल्याच्या बांधण्यासाठी इटलीतून कामगार बोलावले होते. त्यासाठी खास इटालियन संगमरवर आणि इतर वस्तूही विदेशातून आणल्या होत्या. या बंगल्यात अनेक आलिशान फिटिंग्ज आणि इतर सजावटीच्या वस्तू लावण्यात आल्या होत्या. या बंगल्यावर त्यावेळी सुमारे 2 लाख रुपये खर्च झाला होता. आता या बंगल्याची किंमत सुमारे 2600 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
बंगला का पडलाय ओस?
फाळणीनंतर मोहम्मद अली जिना पाकिस्तानात गेले. पण त्यांनी जिना हाऊस विकले नाही. पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकामागून एक अनेक पत्रे लिहून जिना हाऊस कोणालाही देऊ नये अशी विनंती केली. जिना यांचा हेतू असा होता की ते अधून मुंबईला येत राहतील आणि येथे आल्यानंतर ते या बंगल्यात राहतील. फाळणीनंतर एका वर्षात जिना जिन्ना यांचा मृत्यू झाला. नेहरूंनी त्यांची विनंती मान्य केली आणि हा बंगला कोणालाही दिला नाही.
न्यायालयात सुरु आहे खटला?
मोहम्मद अली जिना यांची मुलगी दीना वाडिया यांनी 2007 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मोहम्मद अली जिना यांचे एकमेव वारस असल्याने जिना हाऊसवर त्यांचा हक्क आहे, असा दावा त्यांनी केला. दिना वाडिया यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा नुशली वाडिया हे तो खटला लढत आहे. नुशली वाडिया हे ब्रिटानिया या भारतीय कंपनीचे मालक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की मोहम्मद अली जिना यांनी त्यांची बहीण फातिमा जिना यांना त्यांच्या मालमत्तेचे एकमेव वारसदार बनवले होते. फाळणीनंतर फातिमा जिनाही पाकिस्तानात गेल्या. त्यामुळे जिना हाऊसला शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आले आणि कायद्यानुसार ते आता भारत सरकारच्या ताब्यात आहे.