Cyrus Mistry : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला काल मुंबई-अहमदाबादला हायवेवर अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. अपघात कसा आणि का झाला, याची महत्वपूर्ण माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.
यातील काही चुका टाळल्या असत्या तर अपघात टळला असता असेही आता बोलले जाऊ लागले आहे. मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. अनहिता पंडोले कार चालवत होत्या.
अपघात झाला त्यावेळी सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारच्या मागील सीटवर होते. तर अनहिता आणि डेरियस पुढील सीटवर बसले होते. जेथे अपघात झाला त्या सूर्या नदीवर दोन पूल आहेत.
या दोनपैकी कोणत्या पुलावरून जायचे याबद्दल अनहिता द्विधा मनस्थितीत होत्या. अखेर त्यांनी कार जुन्या पुलावरून नेली. हा पूल नव्या पुलाच्या तुलनेत खाली आहे.
कारला अपघात झाला त्यावेळी ती भरधाव वेगात होती. शिवाय कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेले नव्हते. त्याची कार भरधाव वेगाने धावत होती.
अपघातापूर्वी अवघ्या ९ मिनिटांत २० किलोमीटर अंतर कारने कापल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. मागील सीटवर बसलेले सायरस आणि जहांगीर यांनी सीटबेल्ट लावलेले नव्हते.
त्यामुळे कार धडकताच त्यांचे डोके पुढच्या सीटवर जोरात आपटले. त्यांनी सीटबेल्ट लावले असते, तर त्यांचं डोके पुढे आदळले नसते. शिवाय एअरबॅग्समुळेही त्यांच्यासाठी रक्षक ठरल्या असत्या, असे आता सांगण्यात येत आहे.