पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या हल्ल्यात भारताने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनची माहिती देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर, असं या हल्ल्याचं वर्णन केलं. शिवाय आम्ही अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी हनुमान निती वापरली असा उल्लेखही राजनाथ सिंग यांनी केला. त्यानंतर ही हनुमान निती काय? ती कशी होती? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.
काय म्हणाले राजनाथ सिंग?
या हल्ल्याची माहिती देतनाना राजनाथ सिंग म्हणाले, ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले, आम्ही त्यांना मारले. भारताचा प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. हा हल्ला फक्त दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित होता. भारतीय सैन्याने अचूकता, दक्षता आणि मानवता दाखवली. यासाठी मी संपूर्ण सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचेही अभिनंदन करतो. संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना हनुमान नितीशी केली.

काय आहे हनुमान निती?
राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, ‘आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केले. त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना जी तत्वे पाळली होती तिच तत्वे आम्ही पाळली. ‘जिन्ह मोही मारा तिन मोही मारे’ म्हणजेच आम्ही फक्त त्यांनाच मारले, ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले. पूर्वीप्रमाणेच यावेळीही आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर दिले. हनुमानजींनी अशोक वाटिका येथे केलेल्या मोहिमेशी ऑपरेशन सिंदूरचा संबंध राजनाथ सिंह यांनी जोडला.
काय होते ऑपरेशन सिंदूर?
भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूरमधील पहिले लक्ष्य मुझफ्फराबादमधील सवाई नाला कॅम्प होते. जे नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर आहे. हे लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर पहाटे 1.05 ते 1.30 च्या दरम्यान हल्ले करण्यात आले. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.