१४ जानेवारी २०२५ : चीनमध्ये महागाई शून्य टक्क्यावर जाऊनही मागणी वाढत नाही. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशांसंदर्भात आक्रमक वक्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे खरेदी करीत आहेत. मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात बरीच वाढ होत आहे.
नजीकच्या भविष्यात शेअर बाजारातून सकारात्मक परताव्याची लक्षणे दिसत नसल्यामुळेही काही गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे.चीन बरोबरच इतर देश सध्याच्या जागतिक अस्थिर परिस्थितीच्या काळात सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
देशातील आणि जागतिक वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत.त्यामुळे लघु ते मध्यम पडल्यात या दोन धातूचे दर जास्त परतावा देण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर दहा डॉलरने वाढून २,६८२ डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.तर चांदीचा दर ०.८३ टक्क्यांनी वाढून ३०.९५ डॉलर प्रति औंस झाला.
चीन मधील किरकोळ किमतीवर आधारित महागाई शून्य टक्क्याच्या जवळ आली आहे.तरीही चीनमध्ये मागणी वाढत नाही.सरकार समोर मागणी वाढविण्यासाठी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच अनेक देशांदरम्यान युद्ध चालू आहेत आणि ते संपण्याची शक्यता कमी आहे.या बाबीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होत आहेत.