१४ जानेवारी २०२५ : इतर चलनाच्या तुलनेत वधारत असलेला डॉलर, अमेरिकेच्या कर्जरोख्या वरील वाढत असलेला परतावा, भारतीय शेअर बाजारातून परत जात असलेली परकीय गुंतवणूक आणि शेअर बाजार निर्देशांकात होत असलेली घट या कारणामुळे रुपयाचे मूल्य एकतर्फी घसरून रोज नव्या निचांकी पातळीवर जात आहे.
अशा परिस्थितीत आयात महाग होऊन भारतात महागाई वाढण्याचा धोका आहे.जर महागाई उच्च पातळीवर गेली तर त्यामुळे व्याजदर कपातीस उशीर लागण्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.बुधवारी रुपयाचा भाव पुन्हा १३ पैशांनी कोसळून ८५ रुपये ८७ प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला.
रुपयाच्या घसरणीला अनेक कारणे कारणीभूत असतानाच खनिज तेलाच्या किमती वाढत असल्याचे नवे कारण निर्माण झाले आहे.खनिज तेलाच्या किमती सध्या ७८ डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेल्या आहेत.भारताला आपल्या गरजेच्या ८५% खनिज तेल आयात करावे लागते.जर खनिज तेल दर वाढले तर आयातिचा खर्च आणखी महाग होऊन वाहतुकीचा खर्च वाढणार आहे.
अशा परिस्थितीत इंधनाचे दर वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी रिझर्व बँकेकडे डॉलरच्या साठ्याशिवाय इतर कोणतेही साधने उपलब्ध नाहीत.घसरणाऱ्या रुपयामुळे आयात महाग होत असले तरी निर्यात वाढण्यास मात्र जास्त पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र जागतिक बाजारातून मागणी कमी असल्यामुळे रुपया घसरूनही निर्यात वाढण्यास मदत होत नसल्याचे दिसून येत आहे.कारण गेल्या दोन महिन्यापासून आयातीपेक्षा निर्यात कमी आहे.यामुळे चालू खात्यावरील तूट वाढण्याचा धोका वाढला आहे.तसे झाले तर त्याचा रुपयांच्या मूल्यावर आणखी दबाव येऊ शकतो.