चिंताजनक ! विद्यार्थी आत्महत्येचा दर लोकसंख्यावाढीपेक्षा अधिक, पहा स्पेशल रिपोर्ट

Published on -

आपल्या देशात विविध कारणांनी विद्यार्थी आत्महत्येचा दर हा एकूण लोकसंख्या वाढीपेक्षाही अधिक असल्याचे धक्कादायक तथ्य बुधवारी एका संशोधन अहवालातून समोर आले आहे.

प्रामुख्याने दाक्षिणात्य राज्य तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जीवन संपवण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

‘राष्ट्रीय गुन्हे तपशील ब्यूरो’च्या (एनसीआरबी) माहितीवर आधारित ‘विद्यार्थी आत्महत्या : एक महामारी व्यापक भारत’ हा अहवाल ‘आयसी ३ परिषद’ व ‘एक्सपो २०२४’ मध्ये सार्वजनिक करण्यात आला. यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा वेग अधोरेखित करण्यात आला आहे.

भारतातील विद्यार्थी आत्महत्येच्या वाढत्या घटनांवरही यातून चिंताजनक माहिती उघडकीस आली आहे. भारतात विद्यार्थी आत्महत्येची संख्या दरवर्षी २ टक्क्यांनी वाढत आहे. विद्यार्थी जीवन संपवण्याच्या प्रकरणांची दखल घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तरीही अशा घटनांची संख्या दरवर्षी २ टक्क्यांनी वाढली आहे. तर एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या घटना ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या दोन दशकांत विद्यार्थी आत्महत्यांमध्ये वार्षिक ४ टक्के वृद्धी झाली. जी राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे, असे अहवाल सांगतो.

२०२२ मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांपैकी (५३ टक्के) पुरुष आहेत. २०२१ ते २०२२ दरम्यान पुरुष विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली. तर विद्यार्थिनींच्या आत्महत्यांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा संशोधकांनी केला.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनी लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूण आत्महत्येचा ट्रेंड मागे टाकला आहे. गेल्या दशकात ०-२४ वयोगटातील लोकसंख्या ५८.२ कोटीवरून ५८.१ कोटींपर्यंत कमी झाली.

तर विद्यार्थी आत्महत्येची संख्या ६,६५४ वरून थेट १३ हजार ४४ पर्यंत वाढली. त्यामुळे देशात विद्यार्थी आत्महत्येचा दर हा एकूण लोकसंख्यावाढीपेक्षाही अधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News