अहिल्यानगर जिल्हा परिषद भरती रखडली! १८ महिन्यांनंतरही शेकडो जागा रिक्त

Published on -

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीत एक मोठा विरोधाभास पाहायला मिळत आहे. एका बाजूला यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी झगडत असताना, जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी मात्र उमेदवारांची टंचाई भासू लागली आहे. तब्बल 937 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही 50 टक्के जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांत पात्र उमेदवार मिळाले नाहीत किंवा ज्या त्या प्रवर्गातील उमेदवारच उपलब्ध नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र अद्यापही 449 पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनावरही मोठा ताण आला आहे. अधिकारी, कर्मचारी यांचा तुटवडा असल्याने अनेक महत्वाची पदे रिक्त असून त्याचा परिणाम सरकारी सेवांवर होत आहे.

भरती प्रक्रियेत अडथळे, पात्र उमेदवारांचा अभाव

या नोकरभरतीसाठी जिल्हा परिषदेने तब्बल 19 संवर्गांमधील 937 पदांसाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, अद्यापही सर्व पदे भरता आलेली नाहीत. या भरतीसाठी आयबीपीएस (IBPS) या कंपनीकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. ऑक्टोबर 2023 मध्ये काही संवर्गांची परीक्षा पार पडली, तर काही संवर्गांच्या परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात आल्या.

निकाल जाहीर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांची निवड करण्यात आली. ऑगस्ट 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील 43 उमेदवारांना निवडपत्र देण्यात आले, ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा आचारसंहितेपूर्वी 285 आरोग्य सेवक (महिला) उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली अजूनही 449 जागा रिक्त असून यातील 230 उमेदवार विविध कारणांमुळे सापडले नाहीत.

पात्र उमेदवारच मिळाले नाहीत!

ही भरती प्रक्रिया एवढी रखडण्यामागे मुख्यतः शैक्षणिक पात्रता आणि आरक्षणासंबंधी काही तांत्रिक समस्या असल्याचे दिसून येते. काही संवर्गांमध्ये आवश्यक त्या प्रवर्गाचे उमेदवारच मिळाले नाहीत, तर काही ठिकाणी उमेदवार असूनही त्यांची शैक्षणिक पात्रता अपुरी आहे. आरोग्य सेवक (महिला) या संवर्गातील 496 पदांपैकी फक्त 284 उमेदवारांची निवड झाली उर्वरित 211 पदांसाठी उमेदवारच उपलब्ध नाहीत 75 जागा माजी सैनिकांसाठी राखीव होत्या, मात्र त्याठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. 136 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार उपलब्ध नाहीत. पशुधन पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गातही अशीच स्थिती आहे.

न्यायालयीन प्रकरणांमुळे 187 जागांची भरती रखडली

याशिवाय, आरोग्य सेवक (पुरुष – हंगामी फवारणी क्षेत्र) या संवर्गातील 187 जागांवरील भरती न्यायप्रविष्ट असल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेतील ही नोकरभरती रखडल्याने प्रशासनावर मोठा ताण पडला आहे. विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे अनेक विभागांत कामकाज सुरळीत चालवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्याची गरज भासत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe