राज्याच्या विविध विभागांमध्ये विविध पदांच्या खूप जागा रिक्त असून विविध विभागांतर्गत भरतीसाठीच्या जाहिराती आता प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कोरोना कालावधीपासून राज्यातील सगळ्या प्रकारच्या भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत.
राज्यामध्ये75 हजार पदांसाठीची मेगा भरती देखील होणार असून विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. याचा अनुषंगाने जर आपण कृषी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राचा विचार केला तर या कार्यक्षेत्रातील कृषी सेवक या पदाच्या रिक्त जागांसाठी देखील आता भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे.

कृषी सेवकांच्या 2070 पदांसाठी होणार भरती
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सरळ सेवेच्या कोट्यातील कृषी सेवकांची 2588 पदे रिक्त असून रिक्त पदांच्या 80 टक्के जागा म्हणजेच 2070 पदे भरली जाणार असून यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता प्राप्त होतास या संबंधीची जाहिरात व पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील अशा आशयाची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, कृषी आयुक्तालयाचा जो काही अधिनस्त गट क आहे.
तेथील विविध संवर्गातील सरळ सेवा पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची जाहिरात देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच या भरती प्रक्रिया अंतर्गत पेसा क्षेत्रातील जी काही पदे आहेत हे देखील निश्चित करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. कृषी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील एकूण रिक्त पदांच्या 80% इतक्या रिक्त जागांसाठी ही पद भरती करण्यात येणार असून शासन निर्णयातील तरतुदींचा विचार केला तर त्यानुसार वाहन चालक आणि गट ड संवर्गातील पदे इत्यादी बाबतचा कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झाला नसल्यामुळे जी पदे वगळण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे ही सगळी भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा असून या कंपनीसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला असून त्याला मान्यता देखील मिळाली आहे.
पेसा क्षेत्रातील देखील पदे भरले जाणार
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांच्या अधिसूचनेचा विचार केला तर त्यानुसार अनुसूचित व आदिवासी क्षेत्र अर्थात पेसा अंतर्गत 17 संवर्गातील सरळ सेवेतील पदे भरण्याबाबत देखील कळवण्यात आले असून यामध्ये कृषी सहाय्यक या संवर्गाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
याबाबतचा शासन निर्णयानुसार नाशिक, पुणे तसेच ठाणे, अमरावती, नागपूर आणि लातूर या विभागीय कृषी सहसंचालक कार्यक्षेत्रातील पेसा कार्यक्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व त्याअंतर्गत येणारी पदसंख्या निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव देखील आता प्रशासकीय विभागाच्या मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर भरती संदर्भातील पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे देखील कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी नमूद केले.