Onion News : कांदा उत्पादकांना ३०० कोटींचे अनुदान वाटप

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Onion News : यंदा दर कोसळले होते, तेव्हा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर केले होते. या अनुदान वाटपाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला असून,

पहिल्या टप्प्यात ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरीत करण्यात येणार आहे. याचा लाभ जवळपास ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अनुदान वितरणाच्या या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रती क्विटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे हे अनुदान वितरण केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरीत होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाईल. कांदा अनुदानासाठी १० कोटींपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

कांदा अनुदानासाठी १० कोटींपेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजारांपर्यंत अनुदान जमा होईल.

ज्या शेतकऱ्यांची १० हजारांपर्यंतची देयके आहेत, त्यांचे पूर्ण अनुदान जमा होईल. तर ज्या लाभार्थ्यांचे देयक १० हजारांपेक्षा जास्त आहे, त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe